आपण लाईट बंद करूयात का?
आपण लाईट बंद करूयात का? मी विचारले....आणि निसंकोचपणे ती ‘हो’
म्हणाली...
असा प्रसंग माझ्या
आयुष्यात प्रथमच घडत होता.रात्रीचे बारा वाजुन गेले होते.आम्ही एकाच रूम मध्ये
होतो.दवाखान्याची ती रूम होती.पेशंट च्या नातेवाईकांला झोपण्यासाठी ती रूम
होती.एकावरती एक तीन जण झोपतील अशा पद्धतीने ते बेड बनवलेले होते.असे दोन बेड
म्हणजे एकूण सहा जण झोपु शकतील अशी सुविधा तेथे होती.
बल्बच्या प्रकाशात ती रूम उजाळून निघाली होती आणि माझी झोपण्याची व्यवस्था
त्याच रूम मध्ये होती.मी रूम मध्ये गेलो तर माझ्या अगोदर तिथे एक सुंदर,देखणी
मुलगी एकटीच बसलेली होती म्हणुन मी जसा आत गेलो तसा बाहेर आलो.मला वाटल हिच्या
घरचे कुणी येथे आल्यावर ती निघुन जाईन आणि तिचा घरचा कुणी पुरुष तेथे त्यांच्या
पेशंट साठी थांबेल.मग आपण आत झोपायला जाऊ.पण दवाखाण्यातील सुरक्षा कर्मचा-याने
सांगितले की ती मुलगी येथेच झोपणार आहे.असे ऎकल्यावर मी स्तब्ध झालो,कारण एका मुली
सोबत मला एकाच रूम मध्ये झोपावे लागणार होते.मी काही वेळ रुमच्या बाहेरच सुरक्षा
कर्मचा-याजवळ बसून राहिलो.परंतु दिवसभर पेशंट सोबत असल्याने आणि पेशंट चौथ्या
मजल्यावर असल्यान सारखे जिने चढून,उतरून पाय बोलू लागले होते.शरीराला झोपेची गरज
होती.पण रूम मध्ये जाण्यास मन तयार होत नव्हते.
मी मन घट्ट करून रूम मध्ये गेलो तर ती तिच्या मोबाईल वर मेसेजेस चेक करत
होती.ती अगदी बिंदास्तपणे तिच्या बेड वर झोपलेली होती.मी लाजत बुजत हळूच माझ्या
बेडवर गेलो आणि पडलो.जरा धाकधूक वाटत होते, हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा जरा जास्तच
पडत होते.डोळ्यावर आलेली झोप पळून गेली होती.मी तसाच पडून होतो पण झोप काय येत
नव्हती.अस एकटच एका रूम मध्ये एका अनोळखी मुली सोबत असण्याची भिती वाटत होती परंतु
तिच्या चेहऱ्यावर कसलीच भिती,चिंता,घबराट दिसत नव्हती.मोबाईलच्या प्रकाशात तिचा
चेहरा अजूनच खुलून दिसत होता.मेसेजेस वाचताना कधी कधी ती हळूच हसत होती आणि मी
चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो.मला काय झोप येत नव्हती.
रूम मध्ये पसरलेला प्रकाश माझ्या डोळ्यांवर येत होता.लाईट बंद करून झोपण्याची
मला सवय होती म्हणुन मी तिला विचारले आपण लाईट बंद करूयात का?....आणि निसंकोचपणे ती हो
म्हणाली...तिच्या त्या ‘हो’ बोलण्यातला बिंदास्तपणा मला कमालीचा भावला.माझ्या मनात
जी भीती होती तशी तिच्या मनात काहीही भीती नव्हती आणि चेहऱ्यावरही भीती दिसत
नव्हती.ती अत्यंत बिनघोर होती,मुली किती बिंदास्त असु शकतात ह्या विचारातच माझा
डोळा कधी लागला ते माझ मलाच कळाल नाही.
सकाळी रूमच्या खिडकीतून आलेल्या सुर्यकिरणांनी मला जाग केल तेव्हा मी एकटाच
रूम मध्ये होतो...
-संदीप बोरगे
छानच
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteAti sundar
ReplyDelete